
“मविआची एक जागा जाईल विधान परिषदेवर त्या संदर्भात तीन पक्षामध्ये चर्चा होईल. विधान परिषदेवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने भूमिका जाहीर केली आहे. उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाणार असतील, तर त्यांना पाठिंबा असेल. ही त्यांची भूमिका त्यांनी जाहीर केली आहे. आता शिवसेनेकडून कोणाला पाठवायचं याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख घेतील ते लवकरच जाहीर करतील. आम्ही सगळे या मताचे आहोत की, विधिमंडळात शिवसेना पक्ष प्रमुखांनी असायला हवं. ते राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी या राज्याचं नेतृत्व केलं आहे. ते मविआचे प्रमुख नेते आहेत. उद्धवजींनी तिथे असणं म्हणजे मविआ एकसंध असणं आहे. ही आमची भूमिका आहे. आता उद्धव ठाकरे त्यांची भूमिका जाहीर करतील” असं संजय राऊत म्हणाले.
टॅक्सी, रिक्षा चालकांना मराठी भाषा सक्तीच्या करण्याच्या निर्णयाचं संजय राऊत यांनी समर्थन केलं. “महाराष्ट्रात मराठी भाषा सर्वांना आलीच पाहिजे. तामिळनाडूत तामीळ, कर्नाटकात कन्नड, बिहार-उत्तर प्रदेशमध्ये हिंदी आली पाहिजे. मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ताबडतोब पत्रकार परिषद घेऊन सांगायाला पाहिजे की, मराठी आलीच पाहिजे” असं संजय राऊत म्हणाले.
‘ऑपरेशन सिंदूर गुंडाळलं’
पहलगाममध्ये अजूनही पर्यटक जात नाहीयत, यावरुन संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली. “प्रेसिडेंट ट्रम्प यांच्या दबावामुळे ऑपरेशन सिंदूर गुंडाळण्यात आलं. आमच्या राज्यकर्त्यांनी इराणचा आदर्श घ्यायला हवा, कसं लढायचं ते. आम्ही ऑपरेशन सिंदूरमधून राजकारण सुरु केलं. ट्रम्प यांचा फोन येताच दहशतवादाविरुद्ध लढाई गुंडाळून ठेवली. ज्यांच्याविरोधात लढायला गेलो तिथे आज ट्रम्प, इस्रायलचे नेते येत आहेत. हे मोदींना खिशात ठेवल्याचं लक्षण आहे” अशी टीका संजय राऊत यांनी केली.
याला राजकीय दहशतवाद म्हणतात
‘भारत झुकणार नाही पण मी झुकलो ट्रम्पसमोर’ अशा शब्दात राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. मल्लिकार्जुन खर्गे पंतप्रधान मोदींना आतंकवादी म्हणाले, यावर विचारलं असता राऊत म्हणाले की, “तसं ते म्हणालेले नाहीत. मोदी सर्वांना घाबरवतात. ईडी, सीबीआय ही त्यांची शस्त्र आहेत. यांच्या माध्यमातून मोदी घाबरवतात” “महिला आरक्षण विधेयक मंजूर झालं नाही. त्यावरुन मोदी घाबरवत होते. अरे, तुम्ही कोण आहात. आम्ही पाहून घेऊ. परिणाम भोगावे लागतील, ही घाबरवण्याची भाषा याला राजकीय दहशतवाद म्हणतात” असं संजय राऊत म्हणाले.