
मुंबई, दि. 12 मे : देशातील सध्याची कठीण आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशी चलनाची बचत करण्यासाठी अनावश्यक परदेश दौरे आणि खर्च टाळण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांच्या या संदेशाला सकारात्मक प्रतिसाद देत महाराष्ट्राचे पर्यटन,खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याणमंत्री, पालकमंत्री, सातारा जिल्हा शंभूराज देसाई यांनी आपल्या कुटुंबासोबत नियोजित असलेला युरोप दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
शंभूराज देसाई यांचा परदेश दौरा रद्द
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे तीन महिन्यांपूर्वी ही कौटुंबिक परदेश सहल ठरविण्यात आली होती. या दौऱ्यात लंडन, पॅरिस आणि ॲम्स्टरडॅम या प्रमुख शहरांचा समावेश होता. कुटुंबासोबत सुट्टी आणि पर्यटनासाठी हा दौरा आखण्यात आला होता. मात्र, देशहिताला प्राधान्य देत आणि विदेशी चलन बचतीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचावा या उद्देशाने देसाई यांनी हा दौरा रद्द केल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रहित अधिक महत्त्वाचे…
मंत्री देसाई यांच्या या निर्णयाचे राजकीय वर्तुळात स्वागत होत असून “देश प्रथम” या भूमिकेचे हे उदाहरण मानले जात आहे. वैयक्तिक आनंद आणि सुट्टीपेक्षा राष्ट्रहित अधिक महत्त्वाचे असल्याचा संदेश या निर्णयातून देण्यात आल्याची चर्चा आहे. देशहिताला प्राधान्य, जबाबदारीची जाणीव आणि साधेपणाचा संदेश देत शंभूराज देसाई यांनी माननीय पंतप्रधानांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला, त्यामुळे त्यांच्या या निर्णयाचे राजकीय वर्तुळात कौतुक होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर देशातील जनतेला ऊर्जा वाचवण्याचे आणि देशातील पैसा देशातच ठेवण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांनी नागरिकांना परदेशी प्रवास टाळण्याचे, परदेशात लग्न करण्याचे आणि सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याच बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वर्षभर सोनं न खरेदी करण्याचेही आवाहन केले आहे. या सर्व आवाहनांना प्रतिसाद देत आता मंत्री शंभूराज देसाई यांनी परदेश दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.