
इराण-अमेरिका संघर्षामुळे जगभरात उर्जासंकटाची स्थिती निर्माण झाली असून त्याचा परिणाम भारतावरही दिसू लागला आहे. देशात इंधनटंचाईची शक्यता लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना काटकसरीने इंधन वापरण्याचे आवाहन केले आहे. केंद्रासह राज्य सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्री देखील आपल्या ताफ्यातील गाड्या कमी करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. काही नेत्यांनी परदेश दौरेही पुढे ढकलले आहेत.
याच पार्श्वभूमीवर खासदार शरद पवार यांनी केंद्र सरकारने तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणी केली आहे. देशातील सध्याच्या परिस्थितीबाबत सर्व पक्षांना विश्वासात घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. आर्थिक आणीबाणीची शक्यता विचारण्यात आल्यानंतर पवार म्हणाले की, नागरिकांनी सरकारच्या सूचनांचे पालन केले आणि इंधन बचतीबाबत गंभीरता दाखवली तर कठीण परिस्थिती टाळता येऊ शकते. तसेच ही परिस्थिती काही दिवसांची असेल तर मोठा परिणाम होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.