
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय हिंसाचाराचे सत्र सुरुच असल्याचे दिसत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते सुवेंदू अधिकारी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी चंद्रनाथ रथ यांची बुधवारी रात्री मध्यमग्राम येथे निर्घृण हत्या करण्यात आली. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने केवळ मध्यमग्रामच नव्हे, तर संपूर्ण पश्चिम बंगाल हादरून गेला आहे. चंद्रनाथ रथ हे उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील भाजपचे महत्त्वाचे रणनीतीकार होते.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा हल्ला अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आला होता. चंद्रनाथ रथ हे त्यांच्या खासगी वाहनाने जात असताना त्यांच्या गाडीचा पाठलाग एक चारचाकी आणि दुचाकी अशी दोन वाहने करत होती. पाठलाग करणाऱ्या गाडीने चंद्रनाथ यांच्या गाडीला ओव्हरटेक केले, त्यामुळे गाडीला वेग कमी करावा लागला. यानंतर मध्यमग्राममधील दोहाडिया या वर्दळीच्या ठिकाणी दोन दुचाकीस्वारांनी त्यांची गाडी थांबवली. यावेळी हल्लेखोरांनी हेल्मेट घातले होते. तसेच त्यांच्या दुचाकीला नंबर प्लेट नव्हती.
गाडी थांबताच हल्लेखोरांनी खिडकीच्या काचेतून थेट चंद्रनाथ यांच्या डोक्याला टार्गेट करत गोळ्या घातल्या. यावेळी पॉईंट ब्लँक रेंज म्हणजे अत्यंत जवळून (Point Blank Range) चार गोळ्या झाडल्या, यावेळी तीन गोळ्या चंद्रनाथ यांच्या छातीत, पोटात आणि डोक्यात लागल्या. ज्यामुळे त्यांना वाचण्याची संधीच मिळाली नाही. भाजप नेते सुकांत मजुमदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रनाथ यांच्या छातीतून पाच गोळ्या काढण्यात आल्या. या हल्ल्यात चंद्रनाथ यांचा चालकही जखमी झाला. त्याने हल्लेखोरांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यावरही गोळीबार करण्यात आला. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
कोण होते चंद्रनाथ रथ?
- चंद्रनाथ रथ हे केवळ भाजपचे कार्यकर्ते नव्हते, तर सुवेंदू अधिकारी यांच्या कोअर टीममधील एक महत्त्वाचे नाव होते.
- गेल्या ५ वर्षांपासून सुवेंदू अधिकारी यांच्या सर्व राजकीय हालचाली, बैठका आणि संघटनात्मक बांधणीची जबाबदारी चंद्रनाथ रथ यांच्याकडे होती.
- उत्तर २४ परगणा या जिल्ह्यात भाजपची पाळेमुळे घट्ट करण्यात त्यांचा मोठा वाटा होता, ज्यामुळे ते अनेक राजकीय विरोधकांच्या डोळ्यात खुपत होते, असा दावा भाजप समर्थकांकडून केला जात आहे.
फॉरेन्सिक तपास आणि पोलीस कारवाई
या घटनेनंतर उत्तर २४ परगणा जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. या गाडीच्या विंडशील्डवर गोळ्यांच्या खुणा स्पष्ट दिसत आहेत. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. प्राथमिक तपासात हा कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा प्रकार असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.
या हत्येनंतर बंगालमधील वातावरण प्रचंड तापले आहे. “माझ्या सहकाऱ्याची हत्या करून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया सुवेंदू अधिकारी यांनी दिली आहे. भाजप नेत्यांनी रात्री उशिरापर्यंत मध्यमग्राममध्ये गर्दी केली होती. या घटनेचा तृणमूल काँग्रेसने निषेध व्यक्त केला आहे. “आम्ही चंद्रनाथ रथ यांच्या हत्येचा तीव्र निषेध करतो. लोकशाहीत हिंसाचाराला स्थान नाही. या प्रकरणाची न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआय (CBI) चौकशी व्हावी, जेणेकरून खरे गुन्हेगार समोर येतील.” अशी प्रतिक्रिया टीएमसीने दिली आहे.