Headlines

ठाकरे गटाला पुन्हा धक्का? अनेक आमदार-खासदार संपर्कात; शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा!

ठाकरे गटाला पुन्हा धक्का? अनेक आमदार-खासदार संपर्कात; शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा!
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? अनेक आमदार-खासदार संपर्कात; शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा!


राज्यात पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आल्याची चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे गटातील काही खासदार आणि आमदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना शिंदे गटाचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या वक्तव्याने आणखी हवा मिळाली आहे. “आमच्या संपर्कात अनेकजण आहेत. ऑपरेशन टायगर करायचं की नाही, याचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील,” असे सूचक विधान त्यांनी केले आहे.

माध्यमांशी संवाद साधताना संजय शिरसाट म्हणाले की, “आम्ही कोणतेही ऑपरेशन टायगर राबवत नाही. मात्र, ज्यांना आमच्यासोबत यायचे आहे त्यांना आम्ही नकार देणार नाही. सध्या अशा प्रकारची मानसिकता नसली तरी योग्य वेळ आल्यास निर्णय घेतला जाईल. आमच्या संपर्कात अनेक लोक आहेत आणि पुढील काही महिन्यांत सध्याची राजकीय समीकरणे कायम राहतील असे वाटत नाही.”

दरम्यान, मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेची सक्ती करण्याच्या निर्णयावरही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. “इतर राज्यांमध्ये त्या त्या राज्याची भाषा बोलली जाते, मग मुंबईत मराठी बोलण्यास विरोध का? चालकांना मराठी शिकण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला आहे. त्यानंतरही नियमांचे पालन न झाल्यास कारवाई होणे स्वाभाविक आहे,” असे शिरसाट यांनी सांगितले.

याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना त्यांनी, “रोहित पवार यांच्या आंदोलनाला आमचा विरोध नाही. मात्र, ते राजकीय फायदा मिळवण्यासाठी आंदोलन करत आहेत. संबंधित प्रकरणात पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी,” असे मत व्यक्त केले.

अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाकडून सुरू असलेल्या कारवाईचेही संजय शिरसाट यांनी स्वागत केले. “एफडीएने सुरू केलेली मोहीम अत्यंत महत्त्वाची आहे. या कारवाईला सरकारकडून पूर्ण संरक्षण दिले जाईल. आतापर्यंत काही अधिकारी निष्क्रिय का होते, हा प्रश्न आहे. व्यापारी आणि काही अधिकाऱ्यांमधील संबंधांमुळे कारवाई थांबली होती का, याचाही तपास झाला पाहिजे. ही मोहीम कोणत्याही परिस्थितीत थांबता कामा नये,” असे त्यांनी स्पष्ट केले.

संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यांमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना उधाण आले असून, आगामी काळात राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *