
हरियाणाच्या गुरुग्राममधून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणाने रागाच्या भरात गर्लफ्रेंडवर रॉकेल ओतून जिवंत जाळल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. आगीत होरपळलेल्या तरुणीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिसांनी आरोपी सुनीलला अटक केली आहे. त्याच्याजवळील रॉकेलची बॉटल देखील जप्त केली आहे. या प्रकरणी आरोपीला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास जलद वेगाने सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुनील हा मागील दीड वर्षांपासून पीडित तरुणीसोबत रिलेशनमध्ये होता. याचदरम्यान पीडित तरुणीला सुनील हा विवाहित असल्याचे समजले. त्यानंतर पीडित तरुणी रागाच्या भरात बॉयफ्रेंडच्या दुकानावर पोहोचली. तिने रागाच्या भरात बॉयफ्रेंडशी भांडू लागली. बॉयफ्रेंडने वादादरम्यान गर्लफ्रेंडच्या अंगावर रॉकेल ओतलं.
दोघांमधील वाद मिटल्याने दोघे गुरुग्रामच्या सोहना रोडवर एका रुमवर गेले. दोघे रात्री रुमवरच झोपी गेले. तरुणीने सकाळी कालचा ड्रेस घातला. तिच्या ड्रेसवरील रॉकेलचा वास गेला नव्हता. त्यानंतरही तिने तोच ड्रेस घातला. काही वेळाने दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. रागाच्या भरात बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला पेटवून दिलं. त्यानंतर आरोपीनेच गर्लफ्रेंडला आर्टेमिस रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती गंभीर झाल्याने सफदरजंग रुग्णालयात हलविण्यात आलं. परंतु तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
…अन् आरोपी अडकला पोलिसांच्या जाळ्यात
पीडित तरुणीचा 27 जुलै रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी 30 जुलै रोजी पोलिसांत तक्रार दिली. तक्रारकर्त्या नातेवाईकांनी सांगितलं की, पीडित तरुणी आणि माझी 22 जुलै रोजी भेट झाली. तिला सुनील उर्फ नोनी नावाच्या व्यक्तीने जिवंत जाळलं. पोलिसांत (Police) तक्रार दिल्यास आईलाही जिवे मारण्याची धमकी त्याने दिली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एफआयआर नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी सुनीलला अटक केली. तत्पूर्वी, सुनीलने गर्लफ्रेंडला जिवंत जाळल्याने गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या प्रकरणी आरोपी सुनीलवर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.