
ठाणे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपावरून जोरदार राजकीय घडामोडी सुरू आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या निवडणुकीत मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे. वसई-विरारमध्ये मजबूत प्रभाव असलेल्या हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला थेट शिवसेनेत विलीन करण्याचा प्रस्ताव शिंदेंनी दिल्याच्या चर्चांनाही उधाण आलं आहे. या माहितीवर अद्याप शिक्कामोर्तब झाला नसला तरी हितेंद्र ठाकूर शिंदेच्या भेटीला गेल्याचं समोर आलं आहे.
दरम्यान, बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र यांच्या राजकीय हालचालींनी या चर्चेला अधिक बळ मिळाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हितेंद्र ठाकूर हे ठाण्याकडे रवाना झाले असून तेथे महत्त्वाच्या राजकीय भेटीगाठी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दुसरीकडे, शिवसेनेकडून रवींद्र फाटक हे इच्छुक मानले जात असताना हितेंद्र ठाकूर यांचे सुपुत्र क्षितिज ठाकूर यांचे नावही चर्चेत आले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत महायुतीत मोठे राजकीय बदल पाहायला मिळू शकतात. सुत्रांच्या माहितीनुसार रवींद्र फाटक आणि हितेंद्र ठाकूर यांनीही भेट घेतली आहे.