
लग्नानंतर प्रत्येक मुलगी सुखी संसाराने स्वप्न पाहात असते. पण या 22 वर्षीय तरुणीच्या स्वप्नांची तर राखरांगोळी झाली आहे. हनिमूनच्या रात्रीच नवऱ्याने बायकोला परक्या पाच पुरुषांना सोपवलं… ही धक्कादायक घटना तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे घडली आहे. 22 वर्षीय तरुणीने नवऱ्यासोबतच इतर 5 जणांवर देखील लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) या घटनेची स्वतःहून दखल घेतली असून राज्य पोलिसांकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. या घटनेमुळे स्थानिक पोलीस प्रशासनातही खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी पतीने लग्नाच्या रात्रीच स्वतःच्या बायकोला दुसऱ्याकडे सोपवलं आहे. एवढंच नाही तर, महिला आयोगाच्या अध्यक्षांनी तेलंगणाचे पोलीस महासंचालक (डीजीपी) यांना या प्रकरणी तात्काळ एफआयआर नोंदवून, सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करून आणि निर्धारित वेळेत तपास पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. शिवाय पीडितेच्या संरक्षणाची पूर्ण खबरदारी बाळगण्यास सांगितलं आहे.
आयोगाने सात दिवसांच्या आत कारवाई करुन रिपोर्ट सादर करावे… असे निर्देश दिले आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) या घटनेचे वर्णन स्त्रीच्या प्रतिष्ठेचे, शारीरिक स्वायत्ततेचे आणि विवाह संस्थेच्या पावित्र्याचे गंभीर उल्लंघन असं केलं आहे. आयोगाने या कृत्याचा तीव्र निषेध केला असून, ही बाब समाजासाठी अत्यंत चिंताजनक असल्याचं म्हटलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 वर्षीय पीडित महिलेने नुकताच तक्रार दाखल केली आहे. ज्यामध्ये घडलेली घटना तिच्या लग्नाच्या पहिल्या रात्री घडली आहे. असं सांगण्यात आलं आहे. महिलेने केलेल्या आरोपांनुसार, 28 जुलै 2025 मध्ये आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यात राहणाऱ्या 28 वर्षीय व्यक्तीसोबत तिचं सब-रजिस्ट्रार कार्यालयात लग्न झालं. लग्नानंतर पीडिता नवऱ्यासोबत भाड्याच्या घरात राहू लागली. पण लग्नाच्या पहिल्या रात्रीच नवऱ्याने त्याच्या पाच मित्रांना घरी बोलावलं आणि दारु पाजली… पीडितेला बळजबरी दारु पाजली.. तिने सांगितल्यानुसार, ‘नशेत असताना जेव्हा ती बेशुद्ध झाली. तेव्हा नवऱ्यासोबत इतर पाच जणांनी देखील तिच्यावर बलात्कार केला.’
तक्रारीच्या आधारे बेगमपेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. पीडितेने यापूर्वी कुकटपल्ली पोलीस ठाण्याशी संपर्क साधला होता, परंतु ही घटना बेगमपेट परिसरात घडल्याने हे प्रकरण तिथे वर्ग करण्यात आलं.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता कुकटपल्ली येथे तिच्या विधवा आई आणि लहान बहिणीसोबत राहते. पोलिसांनी सांगितल्यानुसार, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता सर्व बाबींचा तपास केला जात असून आरोपींना लवकरच अटक केली जाईल.