
Flop Film Hit On OTT: चित्रपटसृष्टीत मोठ्या बजेटच्या चित्रपटांबाबत अनेकदा असे दिसून येते की थिएटरमध्ये रिलीज झाल्यावर ते अपेक्षित यश मिळवू शकत नाहीत. प्रेक्षकांकडून कमी प्रतिसाद मिळाल्यामुळे हे चित्रपट फ्लॉप ठरतात. मात्र, हेच चित्रपट जेव्हा ओटीटी प्लॅटफॉर्मवर येतात, तेव्हा अचानक लोकप्रिय होतात आणि प्रेक्षकांची पहिली पसंती बनतात. घरबसल्या आरामात पाहण्याची सोय मिळाल्यामुळे अनेक जण अशा चित्रपटांना दुसरी संधी देतात.
सध्या अशाच एका हॉलिवूड चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. कोट्यवधींच्या बजेटमध्ये तयार झालेला ‘क्राइम 101’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रेक्षकांना आकर्षित करण्यात अपयशी ठरला. मात्र, ओटीटीवर रिलीज झाल्यानंतर त्याने जबरदस्त कमबॅक केला आहे. गेल्या 11 दिवसांपासून हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर नंबर 1 ट्रेंडिंगमध्ये कायम आहे.
दमदार स्टारकास्ट
या चित्रपटाचे दिग्दर्शन बार्ट लेटन यांनी केले आहे. चित्रपटात क्रिस हेम्सवर्थ, मार्क रफालो, बैरी कोगन आणि हॅले बेरी यांसारखे दमदार कलाकार आहेत. थिएटरमध्ये कमी प्रतिसाद मिळाला असला तरी ओटीटीवर त्यांच्या अभिनयाचे भरभरून कौतुक होत आहे.
चित्रपटाची कथा एका अत्यंत शातिर डायमंड चोराभोवती फिरते. ‘डेव्हिस’ नावाचा हा चोर मोठ्या चोरी अत्यंत हुशारीने आणि हिंसाचार न करता करतो. त्याची भूमिका क्रिस हेम्सवर्थ यांनी साकारली आहे. आयुष्यातील शेवटची मोठी चोरी करून गुन्हेगारी जगातून बाहेर पडण्याचा त्याचा विचार असतो.
दरम्यान, त्याची भेट एका इन्शुरन्स एजंटशी होते, जी स्वतःच्या आयुष्यातील गुंतागुंतींशी झुंज देत असते. कथेत ट्विस्ट तेव्हा येतो, जेव्हा एक प्रामाणिक आणि हट्टी पोलीस तपास अधिकारी ‘लू’ डेव्हिसच्या मागावर लागतो. त्यानंतर चोर, एजंट आणि पोलीस यांच्यातील थरारक पाठलाग प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.
बजेट आणि कमाई
या चित्रपटाचा बजेट सुमारे 747 कोटी रुपये इतके होते. मात्र, बॉक्स ऑफिसवर तो केवळ 595 कोटी रुपये इतकीच कमाई करू शकला. त्यामुळे हा चित्रपट आर्थिकदृष्ट्या अपयशी ठरला.
थिएटरमध्ये अपयश आले असले तरी ओटीटीवर या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. प्राइम व्हिडिओ वर रिलीज झाल्यानंतर हा चित्रपट सतत ट्रेंडिंगमध्ये आहे. IMDb वरही याला 6.9 रेटिंग मिळाली असून भारतातही प्रेक्षक या चित्रपटाची कथा, वेगवान मांडणी आणि अभिनय याचे कौतुक करत आहेत.