
कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीचे वेध सध्या लागले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात गोकुळच्या राजकारणाला उकळी आली आहे . एका बाजूला गोकुळ दूध संघाच्या वाढीव सभासद संख्येवरून न्यायालयीन लढाई सुरू असतानाच आता महायुती मधील नेत्यांमध्येच संघाच्या कारभारावरून आरोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. त्यामुळे गोकुळची निवडणूक आता पक्ष पातळीवर होणार की पुन्हा एकदा सोयीच्या स्थानिक आघाड्या केल्या जाणार याकडे जिल्ह्याचं लक्ष लागल आहे.
गोकुळ दूध संघ कोल्हापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ ही कोल्हापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी आहे. त्यामुळे या संस्थेवर सत्ता मिळवण्यासाठी नेहमीच कोल्हापूर जिल्ह्यात सत्ता संघर्ष पाहायला मिळाला आहे. आतापर्यंत पक्ष विरहित असलेली ही निवडणूक यावेळेस मात्र पक्षीय पातळीवर लढवली जाण्याची शक्यता आहे. राज्य पातळीवरील राजकीय समीकरणे पाहता त्याचे पडसाद गोकुळच्या आगामी निवडणुकीवर देखील उमटणार आहेत. सध्या गोकुळ दूध संघात मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांची एकत्रित सत्ता आहे. मात्र येणाऱ्या निवडणुकीत सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांची एकत्रित आघाडी होणं जवळपास अशक्य झालं आहे. जिल्ह्यातील महायुतीच्या सर्वच नेत्यांनी गोकुळची निवडणूक महायुती म्हणूनच लढवणार असल्याची भूमिका जाहीर केली आहे.
गोकुळच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
एकीकडे जिल्ह्यातील नेते गोकुळ साठी महायुतीची मोट बांधत असतानाच दुसरीकडे भाजपचे चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी मात्र या पाच वर्षातील गोकुळच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अप्रत्यक्षपणे मंत्री हसन मुश्रीफ यांनाच लक्ष केलं आहे. इतकच नाही तर गोकुळ दूध संघाच्या कारभाराची ईडीमार्फत चौकशीची मागणीच त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत सत्तेत असलेल्या सतेज पाटील यांनी गोकुळमध्ये कुठेही गैरप्रकार झाला नसल्याचं सांगत मंत्री हसन मुश्रीफ यांची पाठराखण केली आहे. त्या काळात आपण कधीही गोकुळला पक्षीय झालंर घातली नाही, मात्र महायुतीकडून हे पाप सुरू असल्याचा आरोप देखील सतेज पाटील यांनी केला. इतकच नाही तर महायुतीमधील नेते मंत्री हसन मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप करत असताना हसन मुश्रीफ इतके हतबल का? असा खोचक सवाल देखील सतेज पाटील यांनी उपस्थित केला आहे.
निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता
गोकुळ दूध संघाच्या विद्यमान संचालकाची मुदत येत्या चार मे ला संपणार आहे तत्पूर्वी नवीन संचालक मंडळ निवडून येणे अपेक्षित होतं. मात्र गोकुळ दूध संघाच्या सभासद नोंदणी वरून सुरू असलेली न्यायालयीन लढाई आणि अन्य कारणांमुळे ही निवडणूक पुढे जाण्याची शक्यता आहे. मात्र असं असलं तरी गोकुळ निवडणुकीवरून महायुतीमध्ये अंतर्गत वादाला सुरुवात झाल्याचं स्पष्टपणे दिसतयं.