
‘अँग्री मॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता सनी देओलने त्याच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलंय. ‘गदर: एक प्रेम कथा’, ‘बॉर्डर’, ‘बॉर्डर 2’ यांसारख्या त्याच्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळाला. अॅक्शन अभिनेता म्हणून त्याला चांगली पसंती मिळाली. परंतु सनी देओलने जेव्हा इंडस्ट्रीत एण्ट्री केली होती, तेव्हा ‘लवर बॉय’ अशी त्याची ओळख होती. ‘बेताब’ या रोमँटिक चित्रपटातून त्याने करिअरची सुरुवात केली. या चित्रपटामुळे सनी रातोरात स्टार बनला होता. धर्मेंद्र यांचा मुलगा म्हणून त्याची ओळख होतीच, परंतु सनीने त्याच्या दमदार अभिनयकौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या चित्रपटात त्याच्यासोबत अमृता सिंहने मुख्य भूमिका साकारली होती.
1983 मध्ये ‘बेताब’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि त्यावेळी हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. या चित्रपटाचं बजेट फक्त तीन कोटी रुपये इतकं होतं. बॉक्स ऑफिसवर ‘बेताब’ने 13.5 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. या चित्रपटाने निर्मात्यांना 450 टक्के नफा मिळवून दिला होता. 2 तास 34 मिनिटांच्या या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये सनी देओलची प्रचंड क्रेझ वाढवली होती. राहुल रवैलने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. तर जावेद अख्तर यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली होती.
‘बेताब’ या चित्रपटात सनी देओल, अमृता सिंह यांच्यासोबतच शम्मी कपूर, निरुपा रॉय, प्रेम चोप्रा, अन्नू कपूर यांच्याही भूमिका होत्या. आर. डी. बर्मन यांनी या चित्रपटाला संगीत दिलं होतं. या चित्रपटात सनी देओल आणि अमृता सिंह यांची लव्ह-स्टोरी पहायला मिळाली होती. या दोघांची केमिस्ट्री तुफान हिट ठरली होती. पहिलाच चित्रपट ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर सनी देओलला अनेक दमदार चित्रपटांचे ऑफर्स मिळू लागले होते.
सनी देओलच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये ‘गबरू’, ‘लाहौर 1947’, ‘इक्का’, ‘जाट 2’, ‘रामायण’, ‘गदर 3’ यांचा समावेश आहे. गबरू आणि रामायणचा पहिला भाग याच वर्षी प्रदर्शित होणार आहेत. रामायण या चित्रपटात तो हनुमानाची भूमिका साकारणार असल्याचं कळतंय. हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर ‘लाहौर 1947’ या चित्रपटाची निर्मिती आमिर खान करत असून त्यात सनी देओलसोबतच प्रिती झिंटाचीही भूमिका आहे.