
आपल्यापैकी अनेकांना ब्रेडचे सेवन करायला खूप आवडते. सकाळच्या नाश्त्यापासून ते संध्याकाळच्या स्नॅक्सपर्यंत अनेकजण ब्रेडपासून तयार सँडविच तसेच विविध पदार्थ बनवून खातात. त्यामुळे ब्रेड तर आपण अनेकदा खातो. पण अनेकदा भेसळ आणि अस्वच्छतेमुळे ब्रेडचे सेवन आरोग्यासाठी धोकादायक ठरतो. पण तुम्ही ओव्हनशिवायही घरी मऊ ब्रेड बनवू शकता. घरी ब्रेड बनवणे खूप सोपे आहे. ताजा ब्रेड इतक चविष्ट लागतो की एकदा बनवल्यावर तुम्ही ब्रेड हा पुन्हा बाजारातून विकत घेणार नाही. काही लोकांच्या रोजच्या सकाळच्या नाश्त्यात ब्रेडचा समावेश असतो. त्यामुळे बाहेरून विकत आणण्याऐवजी घरी ताजा ब्रेड बनवणे केवळ चविष्टच नाही, तर आरोग्यासाठीही चांगले आहे. तुमच्याकडे ओव्हन नसला तरीही तुम्ही ब्रेड बनवू शकता. चला तर मग आजच्या लेखात आपण ब्रेड बनवण्याची रेसिपी जाणून घेऊयात.
आपल्याला सर्वांना तर माहितच आहे की ब्रेड बनवण्यासाठी ओव्हनची गरज लागतेच. पण तुम्ही हेल्दी आणि चांगल्या दर्जाचा ब्रेड बनवून खायचा असेल तर तुम्ही तो ओव्हनशिवाय देखील बाजारात मिळतो तसा ब्रेड बनवू शकता. यासाठी काही निवडक साहित्यांची गरज आह. चला तर मग आजच्या लेखात आपण घरच्या घरी ब्रेड बनवण्यासाठी कोणकोणत्या साहित्यांची गरज लागते आणि कसा बनवायचा ते जाणून घेऊयात.
ओव्हनशिवाय घरी मऊ ब्रेड बनवा
ब्रेड बनवण्याचे साहित्य
तुम्हाला 1 कप दूध, 1 छोटा चमचा व्हिनेगर, 2 छोटे चमचे पिठीसाखर, 2 कप मैदा, अर्धा छोटा चमचा बेकिंग पावडर, 1 छोटा चमचा मीठ, 2 छोटे चमचे तेल, अर्धा कप दही, अर्धा छोटा चमचा मिल्क पावडर लागेल.
ब्रेडची बनवण्याची रेसिपी
गरम दुधात 1 चमचा व्हिनेगर टाकून चांगले मिक्स करा आणि 5 मिनिटे बाजूला ठेवा.
5 मिनिटांनी दूध थोडेसे फाटेल. आता याच भांड्यात तेल, दही आणि साखर घालून हे सर्व मिश्रण चांगले मिक्स करा.
आता एका मोठ्या भांड्यात मैदा, बेकिंग पावडर, मिल्क पावडर आणि थोडे मीठ घालून चाळून घ्या.
आता हे चाळलेले पीठ दुधाच्या मिश्रणात टाकून पीठ मळून घ्या.
मिश्रण थोडे घट्ट वाटल्यास त्याचा घट्टपणा कमी करण्यासाठी त्यात थोडे दूध टाका. लक्षात ठेवा पीठ घट्ट नसावे तर एक क्रिमी टेक्सचर बनायला हवे.
तयार केलेल्या मिश्रणात इनोचे एक पाकीट टाका. यामुळे ब्रेड फुगण्यास मदत होईल.
आता हे तयार केलेले मिश्रण साच्यात ओता आणि टेबलावर हलकेच टॅप करा, जेणेकरून आत असलेली हवा निघून जाईल.
तुमची इच्छा असल्यास तुम्ही त्यावर थोडे तीळ टाकू शकता.
पॅनमध्ये थोडे मीठ टाका. त्यावर एक स्टँड ठेवा आणि मग तयार केलेला पिठाचा साचा ठेवा.
तुम्हाला ते झाकून मध्यम आचेवर किमान 50 मिनिटे बेक करावे लागेल.
तुमची ब्रेड बेक झाल्यावर त्यावर बटरचा हलका थर लावा आणि 10 ते 15 मिनिटे थंड झाल्यावर साच्यातून काढा.
https://www.instagram.com/reel/C37iuVtSMzn/?utm_source=ig_embed&ig_rid=df1f7ea1-e04c-4de0-abf9-761b71b987c2
या टिप्स लक्षात ठेवा
हा ब्रेड बनवण्यासाठी तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचे किंवा मल्टीग्रेन पीठ वापरू शकता. कुरकुरीतपणा आणि पौष्टिकतेसाठी तुमच्या आवडीनुसार कोणत्याही बिया आणि सुकामेवा घाला. उत्तम ब्रेड बनवण्यासाठी तुम्ही सर्व साहित्य काळजीपूर्वक मोजले पाहिजे. बेकिंग करताना आणि थंड होत असताना ब्रेड झाकून ठेवा. यामुळे ब्रेडवरचा भाग कडक होत नाही.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)