
पाकिस्तानने गुरुवारी फतह-4 ग्राऊंड लॉन्च क्रूज मिसाइलची यशस्वी चाचणी केली. लांब पल्ल्याच्या लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची या मिसाइलची क्षमता आहे. फतह-4 मुळे पाकिस्तानी सैन्य दलाची क्षमता वाढली आहे. पाकिस्तानच्या आर्मी रॉकेट फोर्स कमांडने हे फतह-4 मिसाइल विकसित केलं आहे. यात अत्याधुनिक एवियोनिक्स आणि आधुनिक नेविगेशन सिस्टिम आहे. ही मिसाइल कमी उंचीवरुन उड्डाण करते. त्यामुळे शत्रुच्या रडारला चकवा देणं सोपं होतं. या मिसाइलने लांब पल्ल्याच्या लक्ष्याचा अचूक वेध घेता येतो असा पाकिस्तानी सैन्याचा दावा आहे. सैन्य क्षमता वाढवणं आणि मिसाइलच्या वेगवेगळ्या भागांची टेक्निकल तपासणी हा या चाचणी मागचा उद्देश होता.
फतह-4 ची रेंज 750 किलोमीटर आहे. या मिसाइलने 750 किमी अंतरापर्यंत अचूकतेने हल्ला करता येतो. यात 330 किलोग्रॅम वजनाचं वॉरहेड बसवता येऊ शकतं. ही मिसाइल टेरेन-हगिंग म्हणजे जमिनीलगत उड्डाण करण्यास सक्षम आहे. तीच या मिसाइलची खासियत आहे. जेणेकरुन रडारची रेंज या मिसाइलला चुकवता येते.
लाहोर, सियालकोट येथून फतह-4 मिसाइल लॉन्च केल्यास
पंजाबमधील अमृतसर, जालंधर, लुधियाना, पटियाला, बठिंडा
जम्मू-कश्मीरमधील जम्मू, पठानकोट, उधमपुर
हरियाणामधील हिसार, सिरसा, अंबाला, हिसार
दिल्ली-NCR मधील : दिल्ली, गुरुग्राम, नोएडा, फरीदाबाद
वरील शहरं फतह-4 च्या रेंजमध्ये येऊ शकतात.
भारताचा काऊंटर प्लान काय?
पाकिस्तानमधील काही एक्सपर्ट्स फतह-4 भारताच्या ब्राह्मोसच्या तोडीचं मिसाइल असल्याचं सांगत आहेत. भले, पाकिस्तान ब्राह्मोसच्या तोडीचं मिसाइल बनवल्याचा दावा करत असेल, तरी या मिसाइलला रोखण्याची क्षमता भारताकडे आहे. भारताकडे काऊंटर प्लान तयार आहे.
भारताकडे वेगवेगळ्या स्तराची एअर डिफेन्स प्रणाली आहे. म्हणजे शत्रुने डागलेल्या क्षेपणास्त्राची रेंज, हाईट यानुसार इंटरसेप्टर क्षेपणास्त्र भारताकडे आहेत. पाकिस्तानने फतेह-3, फतेह-4 मिसाइल डागल्यास ते हवेतच संपवण्यासाठी भारताकडे बराक-8 इंटरसेप्टर मिसाइल आहे. इस्रायल आणि भारताच्या DRDO ने मिळून हे मिसाइल विकसित केलं आहे. पाकिस्तानच्या क्रूज मिसाइलच उत्तर भारताकडे तयार आहे.