
मराठा आरक्षणासंदर्भात अजूनही काही मागण्या मान्य होत नाहीत, म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. 30 मे पासून ते आंदोलन सुरु करणार होते. मनोज जरांगे पाटील यांनी हे आंदोलन करु नये म्हणून भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आज त्यांची भेट घेतली. ते अंतरवली सराटीमध्ये आले होते. दोन्ही नेत्यांमध्ये कॅमेऱ्यासमोर संवाद झाला. मनोज जरांगे यांनी सरकारला 28 मे पर्यंतची डेडलाईन दिली आहे. मनोग जरांगेंच्या मागण्यांवर सरकार गंभीर असल्याचं प्रसाद लाड यांनी सांगितलं. मुंबईत जाऊन चर्चा करणार आणि फोनवरून जरांगेंना कळवणार असा शब्द प्रसाद लाड यांनी दिला आहे.
“28 तारखे पर्यंत उत्तर उपसमिती देणार आहे. उपसमितीने निर्णय नाही घेतला तर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार. त्यांच्या भावना घेऊन चाललो आहे, मुंबई मध्ये जाऊन राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहे” असं प्रसाद लाड यांनी सांगितलं. ‘मनोज जरांगेंवर पुन्हा उपोषणाची वेळ येऊ देणार नाही. 29 तारखेला पुन्हा अंतरवलीत जरांगेंना भेटायला येणार’ असं प्रसाद लाड म्हणाले.
मनोज जरांगे यांच्या मागण्या काय?
“सातारा संस्थानने गॅझेट काढला. त्यानुसार प्रमाणपत्र देण्यात यावे. ज्याचे प्रमाण पत्र मिळाले त्यांना व्हॅलीडीटी द्या. 58 नोंदी सापडल्या त्यांचे प्रमाण पत्र देण्यात यावे.मराठा आणि कुणबी स्वतंत्र मंत्रालय असावे” अशा मागण्या मनोज जरांगे पाटील यांनी केल्या.
.. तर काही सांगता येत नाही
“माझे आणि देवेंद्र फडणवीस किंवा प्रसाद लाड यांचे वैर नाही. 23 तारखेपर्यंत बैठकी थांबलेल्या राहतील. एकदा प्रसाद लाड यांच्यावर विश्वास ठेवू. मागण्या मान्य झाल्या नाही तर आंतरवाली मध्ये उपोषण होणार आहे. मला वाटत नाही 30 तारखेला आंदोलन करण्याची गरज वाटत नाही, पण लाड यांचे मुख्यमंत्र्यांनी ऐकले नाही, तर काही सांगता येत नाही” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
आम्ही तुम्हाला गरीब मराठे दाखवतो
आरक्षणाचा मागास ठरवण्याचा निकष काय? असा सवाल आज मनोज जरांगे पाटील यांनी प्रसाद लाड यांच्यासमोर विचारला. “गरीब म्हणून निकष लावला का? तसं असेल तर आम्ही तुम्हाला गरीब मराठे दाखवतो. मराठ्याला का आरक्षण द्यायचं नाही? मराठ्याकडे शाळा, कॉलेज, कारखाने आहेत म्हणून आरक्षण द्यायचं नाही का?” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.