
सोशल मीडियावर सध्या आयुष सिंह या 19 वर्षांच्या तरुणाची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्याची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. कारण आयुषने कोणतीही मोठ्या कॉलेजची पदवी किंवा श्रीमंत पार्श्वभूमी नसताना स्वतःच्या बळावर कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व्यवसाय उभा केला आहे, यातून तो दरमहा सुमारे 1 कोटी रुपये कमावतो. आयुषची ही प्रेरणादायी कहाणी टॉपमेटचे सह-संस्थापक आणि CTO दिनेश सिंह यांनी लिंक्डइनवर शेअर केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
दिनेश सिंह यांनी आयुषची स्टोरी शेअर करताना सांगितले की, आयुष ना IIT मधून पदवीधर आहेत, ना MIT मधून. कोरोनाच्या काळात आयुष अवघा 13 वर्षांचा होता, त्यावेळी त्याचे कुटुंब आर्थिक संकटात होते. त्यावेळी आयुषकडे फक्त एक जुना लॅपटॉप, कसेबसे चालणारे इंटरनेट कनेक्शन आणि काही जुने ऑनलाइन कोर्सेस होते. मात्र, काहीतरी नवीन शिकण्याची जिद्द त्यांच्यात होती. याच जिद्दीच्या जोरावर त्याने AI चा महत्त्वाचा भाग असलेले मशीन लर्निंग शिकून घेतले.
14 व्या वर्षी MIT कडून कौतुक
आयुषला त्याच्या मेहनतीचे फळ लवकरच मिळाले. काही महिन्यांतच तो परदेशी स्टार्टअप्ससोबत काम करू लागला. तो केवळ 14 वर्षांचे असताना जगातील प्रतिष्ठित संस्था MIT (मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) ने त्याने तयार केलेल्या कोर्सचे कौतुक केले आणि लोकांना ते शिकण्याची शिफारस केली.
हजारो तरुणांना प्रशिक्षण
सुरुवातीला आयुषला आपल्या कामासाठी खूप कमी पैसे मिळत असत. कालांतराने त्याने कोडिंग आणि मशिल लर्निंगचे आपले ज्ञान लोकांसमोर कसे मांडायचे हे शिकून घेतले, त्यामुळे त्याच्या कमाईत वाढ झाली. आज आयुष टॉपमेट प्लॅटफॉर्मवर AI विषयावरील प्रीमियम कोर्सेस चालवतो आणि हजारो तरुणांना प्रशिक्षण देतो.
टॅलेंट असते पण व्यवसाय कसा करायचा हे माहीत नसते
दिनेश सिंह यांनी या कथेद्वारे एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. त्यांच्या मते, आज इंटरनेटवर अनेक लोकांकडे चांगली कौशल्ये आहेत, ज्यासाठी लोक पैसे द्यायलाही तयार असतात. मात्र अनेकांना आपल्या कौशल्याचे व्यवसायात रूपांतर कसे करायचे किंवा त्यातून उत्पन्न कसे मिळवायचे हे माहीत नसते. त्यामुळे अनेकांना पैसे कमावण्यात अडचणी येत आहेत.