
मुख्यमंत्री देवेंद्र यांचा एका बैठकीतील व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर मुख्यमंत्र्यांनी जोरदार संताप व्यक्त केला आहे. राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांना त्यांनी कडक शब्दांत तंबी दिली. दिलेल्या मुदतीत काम पूर्ण झालेच पाहिजे, अन्यथा भविष्यात दुसरे कोणतेही काम दिले जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
सह्याद्री अतिथिगृह येथे आयोजित पायाभूत सुविधा मुख्यमंत्री वॉर रूम बैठकीत विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित यंत्रणा आणि कंत्राटदारांना स्पष्ट शब्दांत सूचना दिल्या. प्रकल्प रखडल्यामुळे राज्याचे आणि देशाचे नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी थोडंसं हिंदी तसेच मराठी मंत्र्यांना मराठीत तडकफडक सुनावले. त्यावेळी ते म्हणाले, ‘ये ये नही चलेगा मुझे… सात आठ साल नही लगता… जनरेशन प्रोजेक्ट हे क्या… वो जमाना गया…’ पुढे ते मंत्र्यां म्हणाले, काय अडचण आहे ती दुर करा नाही चालणार हे असं…
महाराष्ट्राच्या विकासासाठी रस्ते, पूल, मेट्रो आणि इतर पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेत पूर्ण होणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. प्रकल्प पूर्ण करताना येणाऱ्या अडचणी तातडीने सोडवाव्यात आणि कामात कोणतीही दिरंगाई होऊ देऊ नये, असे निर्देश त्यांनी दिले. बैठकीतील मुख्यमंत्र्यांचा आक्रमक पवित्रा दाखवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.