
नाशिक टीसीएस लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणातील मास्टरमांईड असलेली निदा खान तब्बल 42 दिवस फरार होती. अखेर तिला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर पोलीस आणि नाशिक पोलिसांनी संयुक्त कारवाई करत निदा खानला अटक केलं. दरम्यान निदा खानला अटक केल्यानंतर तिला शुक्रवारी नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. नाशिक सत्र न्यायालयानं निदा खानला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या तिची एसआयटीकडून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान आज छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी निदा खानबद्दल मोठं विधान केलं आहे.
नेमकं काय म्हणाले ओवैसी?
निदा खान एचआर डिपार्टमेंटमध्ये काम करत नव्हती, असा दावा ओवैसी यांनी केला आहे. एफआयआर दाखल होण्यापूर्वीच निदा खानची ट्रान्सफर झाली होती. आम्हाला विश्वास आहे, की कोर्ट न्याय करेल. आरोप सिद्ध होईपर्यंत कोणीही दोषी ठरत नाही. आरोप करणाऱ्यांनी आरोप सिद्ध करावेत. राजकीय द्वेषातून आरोप करण्यात आले आहेत, त्यामुळे इन्शाल्लाह निदा खानला न्याय मिळेल, तिच्यावरचे आरोप सिद्ध होणार नाहीत, असं ओवैसी यांनी म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, सध्या काही लोकांकडून मीडिया ट्रायल सुरू आहे. टीसीएस कंपनीतील तक्रारदार हा राजकीय पक्षासी संबंधित आहे, असा आरोपही यावेळी निदा खान प्रकरणात ओवैसी यांनी केला आहे. निदा खानवरील आरोप कोर्टात टिकणार नाहीत, असं ओवैसी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान नाशिक टीसीएस कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरण समोर आल्यानं संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकणातील इतर आरोपींना आधीच अटक करण्यात आली आहे. मात्र निदा खान 42 दिवस फरार होती. अखेर तिला देखील आता अटक करण्यात आली आहे. तिला न्यायालयानं चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, तिची सध्या एसआटीकडून चौकशी सुरू आहे.