
जळगाव जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जळगावातील पाऊस किंवा राजकीय वातावरणामुळे जिल्हा चर्चेत आलेला नाही. एखाद्या गुन्हेगारी घटनेमुळे हा जिल्हा चर्चेत आलेला नाही. तर एका मोठ्या रेडमुळे हा जिल्हा चर्चेत आला आहे. एखाद्या धनकुबेरालाही लाजवेल अशी संपत्ती सापडली आहे. अकोला येथील मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात हे मोठं घबाड सापडलं आहे. हा जिल्हाधिकारी जळगावात राहतो. या घरात रेड मारण्यात आली. प्रचंड पैसा आणि सोनं सापडलं. जळगावातील ही सर्वात मोठी रेड असल्याचं सांगितलं जात आहे.
लाचखोरी प्रकरणी अटकेतील अकोला येथील मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या जळगाव येथील घरात एसीबीच्या पथकाला मोठे घबाड हाती लागले आहे. अकोला येथील मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्या जळगाव येथील राहत्या घरी काल रात्री नाशिक आणि जळगाव एसीबीच्या पथकाकडून ‘इन-कॅमेरा’ झाडाझडती करण्यात आली. यावेळी कारवाईत पथकाने दीड कोटींची रोख रक्कम, 72 लाखांचे सोन्या चांदीचे दागिने आणि 62 लाखांची मालमत्ता असलेली कागदपत्रे अशी एकूण 2 कोटी 94 लाख 64 हजार 847 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रात्रीपासूनच हा मुद्देमाल मोजण्यात येत होता. मुद्देमाल मोजता मोजता दमछाक झाली. पण संपत्ती काही संपत नव्हती, असं सूत्रांनी सांगितलं.
10 हजाराची लाच अन्…
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 8 ते 10 अधिकाऱ्यांच्या पथकाकडून घराच्या झेडपीमध्ये मोठा मुद्देमाल मिळून आला आहे. याबाबतची माहिती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. किरण चौधरी यांना 10 हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली असून अकोला जिल्ह्यातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. लाच प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर लाचलूचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौधरी यांच्या जळगाव येथील घरी धाड टाकून मोठी संपत्ती जप्त केली आहे.
नातेवाईकांकडून घरफोडी
चौधरी यांच्या जळगावातील सीलबंद घराची नाशिक आणि जळगाव येथील एसीबीच्या संयुक्त पथकाकडून ‘इन-कॅमेरा’ तपासणी करण्यात आली. कारवाई झालेल्या मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांच्या सीलबंद घरात त्यांच्या नातेवाईकांना घरफोडी करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले होते. घरफोडीचा प्रयत्न झाल्यामुळे घर पुन्हा सील करून त्या ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात केला आहे
काय काय सापडलं?
1 कोटी 53 लाख 84 हजार 630 रुपयांची रोख रक्कम
60 लाख 57 हजार 135 रूपयांचे 422.100 ग्रॅम सोन्याचे दागिने
31 हजार 416 रुपयांचे 154.500 ग्रॅम चांदीचे दागिने
11 लाख 52 हजार 745 रुपयांच्या सोने खरेदी केल्याच्या पावत्या
6 लाख 25 हजार 545 रुपयांच्या घरातील वस्तू
62 लाख 13 हजार 376 रुपये किमतीच्या वेगवेगळ्या ठिकाणी आरोपी आणि त्याच्या कुटुंबियांच्या नावे प्रॉपर्टी असल्याची कागदपत्रे
असा एकूण 2 कोटी 94 लाख 64 हजार 847 रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला असून तो जप्त करण्यात आला आहे.