
रोजच्या धावपळीतून आराम मिळावा तसेच काही दिवस शांततेत राहण्यासाठी आपल्यापैकी अनेकजण बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. तसेच काही निसर्ग प्रेमी हे निसर्गाच्या सानिध्यात जाऊन आराम करतात. तर तुम्ही शांत आणि थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर हिमाचल प्रदेशाच्या सुंदर दऱ्यांमध्ये वसलेले शांगढ हे एक उत्तम ठिकाण आहे. हे छोटे पण आकर्षक ठिकाण प्रवासी प्रेमींमध्ये झपाट्याने लोकप्रिय होत आहे. येथील हिरवीगार शेतं, उंच पाइनची झाडं, शांत वातावरण आणि ढगांनी वेढलेले पर्वत भेट देणाऱ्या प्रत्येकाला मोहित करतात. म्हणूनच अनेकजण याला हिमाचलचा लपलेला स्वर्ग म्हणतात.
विशेष म्हणजे, ‘मिनी थायलंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिबीपासून शांगढ फक्त तीन तासांच्या अंतरावर आहे. जर तुम्ही आधीच लोकप्रिय आणि गर्दीने भरलेल्या थंड हवेच्या ठिकाणांपासून दूर, एखाद्या शांत आणि अनोख्या ठिकाणांच्या शोधात असाल, तर तुम्हाला शांगढ नक्कीच आवडेल. या लेखात आपण शांगढची खास वैशिष्ट्ये, तिथे कसे पोहोचायचे आणि आवर्जून भेट देण्यासारखी आकर्षणे याबद्दल जाणून घेऊयात.
शांगढचे वैशिष्ट्य काय आहे?
शांगढचे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे त्याचा साधेपणा आणि नैसर्गिक सौंदर्य. हे ठिकाण शहरीही नाही आणि गर्दीनेही गजबजलेले नाही. यामुळेच निसर्गप्रेमी, ट्रेकर्स आणि निवांत सुट्टीच्या शोधात असलेले लोकं या ठिकाणाकडे अधिकाधिक आकर्षित होत आहेत. हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील सैंज खोऱ्यात हे निसर्गरम्य गाव वसलेले आहे.
शांगढमध्ये काय पाहावे?
शांगढ हे त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि शांत वातावरणासाठी ओळखले जाते. येथील मुख्य आकर्षण म्हणजे शांगढ मेडोज, जे घनदाट पाइनच्या जंगलांनी आणि पर्वतांनी वेढलेले एक विस्तीर्ण हिरवेगार कुरण आहे. येथे बसून तुम्ही थंडगार वाऱ्याचा आणि विहंगम दृश्यांचा आनंद घेऊ शकता. बारशांगढ धबधबा आणि आजूबाजूची छोटी गावे देखील भेट देण्यासारखी आहेत. जर तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल, तर तुम्ही ग्रेट हिमालयन नॅशनल पार्ककडे जाणाऱ्या ट्रेक्सचा देखील शोध घेऊ शकता. तुम्ही हिमाचल प्रदेशात फिरायला जाण्याचा प्लॅन केला असेल तर या ठिकाणांना नक्की भेट द्या.