
राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठ्या घडमोडी घडताना दिसत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जोरदार धक्के बसत आहेत. काही दिवसांपूर्वी 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनीही ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. एक महिला नेत्याने आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. थोड्याच वेळात शेकडो कार्यकर्त्यांसह हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
महिला नेत्याचा थोड्याच वेळात शिवसेनेत प्रवेश
खासदारांच्या फुटीनंतर ऑपरेशन टायगर पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे पहायला मिळत आहे. आता ठाकरे सेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील शिंदे सेनेच्या गळाला लागल्या आहे. समोर आलेल्या माहितीनुसार उपनेत्या शुभांगी पाटील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी धुळ्यावरून हजारो कार्यकर्त्यांसह मुंबईकडे रवाना झाल्या आहेत. मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शुभांगी पाटील यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
उद्धव ठाकरेंवर नाराज नाही, पण…
गेल्या काही काळापासून शुभांगी पाटील या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या, मात्र शुभांगी पाटील यांनी या चर्चा फेटाळल्या होत्या. मात्र आता शुभांगी पाटील यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत बोलताना शुभांगी पाटील यांनी सांगितले की, ‘उद्धव ठाकरे साहेबांवर कुठल्याही प्रकारची नाराजी नाही परंतु हजारो कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आग्रहास्तव मी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे शुभांगी पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
ऑपरेशन टायगर
दरम्यान, काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. विकासनिधी मिळत नसल्याचे कारण देत त्यांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. खासदारांच्या प्रवेशानंतर ठाकरे गटाचे इतरही अनेक नेते आगामी काळात शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.