
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या चित्रपटाला थिएटरमध्ये एक महिना पूर्ण झाला आहे. 1 मे 2026 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. या चित्रपटात मराठी आणि हिंदी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. अभिनेत्री भाग्यश्रीने यामध्ये जिजाऊंची भूमिका साकारली आहे.
'राजा शिवाजी' या चित्रपटाला एक महिना पूर्ण झाल्यानिमित्त भाग्यश्रीने इन्स्टाग्रामवर सेटवरील खास फोटो पोस्ट केले आहेत. त्याचसोबत तिने या भूमिकेविषयी तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'भारताच्या इतिहासातील अत्यंत प्रतिष्ठित महिलेची, जिजाबाईंची भूमिका साकारून एक महिना पूर्ण झाला', असं तिने लिहिलं आहे.
या पोस्टमध्ये तिने पुढे म्हटलंय, 'मैंने प्यार किया या चित्रपटात आदर्श नायिकेची भूमिका साकारण्यापासून ते जिजाऊंसारख्या कणखर स्त्रीचे रुप धारण करण्यापर्यंतचा हा एक प्रवास राहिला आहे. आयुष्यातील अनुभव या ट्रान्झिशनमध्ये फार मदत करतात. पण दोन महत्त्वाच्या घटकांनी माझ्यासाठी हा टप्पा अविस्मरणीय बनवला आहे.'
पहिलं म्हणजे मोठ्या पडद्यावर आपल्या स्वप्नांमध्ये रंग भरण्याची क्षमता माझ्यात आहे, याबद्दल रितेश देशमुखने माझ्यावर दाखवलेला विश्वास. दुसरं म्हणजे तुम्हा सर्वांकडून मला मिळणारं असीम प्रेम. मी मनापासून तुम्हा सर्वांचे आभार मानते, अशा शब्दांत भाग्यश्रीने कृतज्ञता व्यक्त केली आहे.
57 वर्षीय भाग्यश्रीने तिच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच अशी ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारली आहे. 1990 च्या दशकात सलमान खानच्या ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातून ती रातोरात स्टार बनली होती. मात्र हिमालय शिवदासानीसोबत लग्न केल्यानंतर तिने फिल्म इंडस्ट्री सोडली होती.