
कोल्हापूर जिल्ह्यासह धरण क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर कायम असून, त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत नदीची पातळी तब्बल दोन फुटांनी वाढून 14.2 फूट इतकी झाली आहे. वाढत्या पावसामुळे नदीकाठच्या परिसरात प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
सततच्या पावसाचा परिणाम जिल्ह्यातील बंधाऱ्यांवरही झाला असून, आतापर्यंत तीन बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यापैकी शिंगणापूर बंधारा ओव्हरफ्लो झाला असून, गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
धोक्याची बाब म्हणजे, पाण्याखाली गेलेल्या या बंधाऱ्यांवरून अद्यापही वाहनांची ये-जा सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. जीव धोक्यात घालून नागरिक आणि वाहनचालक प्रवास करत असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यांवरून प्रवास टाळण्याचे आवाहन केले असून, नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहावे, असेही सांगितले आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तवल्याने प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.