
EPFO Rules for PF Withdrawn: देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांना लवकरच युपीआय आणि एटीएमद्वारे पीएफ काढता येणार आहे. EPFO 3.0 च्या बदलामुळे पीएफ काढणे सोपे, सहज आणि जलद होणार आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल असेल. नव्या प्रणालीमुळे सदस्यांना कागदी घोडे नाचवण्याची गरज राहणार नाही.
पेपरलेस आणि ऑनलाईन प्रक्रियेमुळे कर्मचाऱ्यांना ईपीएफओ कार्यालयाचे उंबरठे वारंवार झिजवावे लागणार नाही. हा फॉर्म भरा, ती कागदपत्र जमा करा आणि पुन्हा पीएफची रक्कम जमा होण्यासाठी वाट पाहा, असा खेळ थांबणार आहे. या नवीन सुविधेची चाचणीही पूर्ण झाली आहे. ही सुविधा कधी सुरू करणार याविषयीची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
आता सर्वांना पडलेला प्रश्न म्हणजे पीएफ मधून 100 टक्के रक्कम काढता येणार का? तर ईपीएफओचे या संबंधी नियम ठरलेले आहेत. त्यानुसार ईपीएफमधील शिल्लक रक्कमेपैकी 50-75 टक्के रक्कम काढता येईल. काही ठराविक आणि आवश्यक कारणांसाठीच रक्कम काढण्याची परवानगी देण्यात येईल. ईपीएफओच्या नियमानुसार, 25 टक्के रक्कम खात्यात ठेवणे आवश्यक आहे.
ईपीएफओ ही कर्मचाऱ्यांच्या सुरक्षित भविष्याचा विचार करते. पीएफची रक्कम ही वृद्धापकाळात कर्मचाऱ्यांच्या मदतीला यावी यासाठी पीएफ खात्यात रक्कम जमा होते. सरकार त्यावर व्याज देते. निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना पेन्शनच्या रुपाने ही रक्कम मिळते. पण अगदीच हातघाईवर काम आले. निकड असली तर कर्मचाऱ्यांना काही ठराविक कारणासाठी ही रक्कम काढता येते. पण ती 100 टक्के काढता येत नाही.
ऑटो सेटलमेंटची मर्यादा सुद्धा आता वाढवण्यात आली आहे. यापूर्वी केवळ 1 लाखांपर्यंतचे दावे झटपट मंजूर होत होते. आता ही मर्यादा वाढवून 5 लाख इतकी करण्यात आली आहे. वैद्यकीय गरज, मुलांचे शिक्षण, लग्न, घर खरेदीसाठी, बांधकामासाठी सदस्यांना पीएफ खात्यातून रक्कम काढता येते. आता क्लेम केल्यानंतर तीन अथवा पाच दिवसात ही रक्कम खात्यात जमा होते.
युपीआय आधारीत पीएफ रक्कम काढण्यासंदर्भातील चाचणी प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविय यांनी दिली आहे. या नवीन सुविधेचा लाभ कधी सुरू होईल हे मात्र त्यांनी जाहीर केले नाही. UPI PIN चा वापर करून सदस्यांना ऑनलाईन पेमेंट काढता येईल असे समोर येत आहे. या सुविधेची कर्मचारी वाट पाहत आहेत.