
एकदा नाही तर महिन्यातून दोनदा पगार द्या! दिग्गज व्यवसायिकाने कंपन्यांना केली अपीलImage Credit source: Peter Dazeley/Photodisc/Getty Images
देशात नोकदारवर्ग मोठा आहे. एखाद्या कंपनीत राबराब राबल्यानंतर महिन्याच्या पगाराची आतुरतेने वाट पाहत असतो. कारण त्या पगारावर पुढचं सर्व गणित अवलंबून असतं. असं असताना शादी डॉक कॉमचे संस्थापक अनुपम मित्तल यांनी कंपन्यांना कर्मचाऱ्यांचा पगार देण्याची पद्धत बदलण्याची अपील केली आहे. कारण सध्या सुरू असलेली पद्धत ब्रिटीश काळापासून सुरू आहे आणि महिन्याच्या शेवटी किंवा पुढच्या महिन्यात पगार दिला जातो. पण अनुपम मित्तर यांनी कर्मचाऱ्यांना महिन्यातून दोनदा पगार देण्याचा सल्ला दिला आहे. हा पगार म्हणजे महिन्याला मिळणाऱ्या पगाराचे दोन भाग.. त्यामुळे नेमकं त्यांना काय म्हणायचं आहे ते समजून घेऊयात…
अनुपम मित्तल यांनी लिंक्डइनवर पोस्ट करत लिहिलं की, काही कंपन्या कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी फ्रीमध्ये जेवण, वर्क फ्रॉम होम आणि सुट्ट्यांचा लाभ देतात. पण महत्त्वाची असलेल्या पगाराकडे कानाडोळा केला जातो. त्यानंतर त्यांनी पुढे लिहिलं की, बहुतांश कंपन्या 7 तारखेच्या आत कर्मचाऱ्यांना पगार देतात. पण कधी कधी सुट्ट्या वगैरे आल्या तर पगार पाठिपुढे होतो. त्यामुळे नोकरदार वर्गाची धाकधूक वाढते. कारण या पगारावर बरीच गणितं अवलंबून असतात. ईएमआय, भाडं आणि बरचं काही डोक्यात असतं.. अनुपम मित्तल यांनी हा संदर्भ देत पुढे सांगितलं की, शादी डॉट कॉमने काही वर्षांपूर्वी पेरोल प्रणालीत बदल केला आहे. आता पगार पुढच्या महिन्यात देण्याऐवजी त्याच महिन्यात दिला जातो.
महिन्यातून दोनदा पगार करण्याचा सल्ला
अनुपम मित्तल यांनी कंपन्यांना कर्मचाऱ्यांचा पगार महिन्यातून दोनदा करण्याचा सल्ला दिला आहे. महिन्यातून दोनदा म्हणजे 15 आणि 30 तारखेला. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात असं करणं कठीण काम नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थिरता मिळू शकते. तसेच कर्जाचा दबाव कमी होईल आणि खर्चाची क्षमताही वाढेल. इतकंच काय तर यामुळे आर्थिक व्यवस्थेत खर्चा गतीही वाढू शकते. त्यामुळे कंपन्या, कर्मचारी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा होईल, असं अनुपम मित्तल यांचं मत आहे.