Headlines

Weather Update : पुढील 48 तास महाराष्ट्रासाठी अत्यंत धोक्याचे, राज्यावर सर्वात मोठं संकट, IMD चा हाय अलर्ट

Weather Update : पुढील 48 तास महाराष्ट्रासाठी अत्यंत धोक्याचे, राज्यावर सर्वात मोठं संकट, IMD चा हाय अलर्ट
Weather Update : पुढील 48 तास महाराष्ट्रासाठी अत्यंत धोक्याचे, राज्यावर सर्वात मोठं संकट, IMD चा हाय अलर्ट


गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण सातत्याने बदलत आहे. राज्यातील काही भागांना हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे, तर काही भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर असे देखील काही भाग आहेत, जिथे उष्णता आणि पाऊस सोबतच पहायला मिळत आहेत.  पुढील दोन दिवसांमध्ये कोकण पट्ट्यामध्ये भारतीय हवामान विभागाकडून (IMD) उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.  महाराष्ट्रावर सध्या चक्रावती वाऱ्यामुळे हवेचा दाब पहायला मिळत आहे, आणि त्याचा परिणाम हा कोकण किनारपट्टीवर जाणवणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. पुढील दोन दिवस कोकणात पाऊस आणि उष्णतेची लाट एकाच वेळी पहायला मिळणार आहे. कोकणासह मुंबईत तापमानाचा पारा 41 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे.  पुढील दोन दिवस असंच वातावरण कायम राहणार आहे.

वाशिम जिल्हा तापला 

दरम्यान अल निनोच्या पार्श्वभूमीवर तापमानात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यात तयारी सुरू केली आहे. उष्ण लहरींचा संभाव्य धोका लक्षात घेऊन पशुवैद्यकीय यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या निर्देशानुसार जनजागृती मोहीम राबवण्यात येत असून, पशुपालकांनी जनावरांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. उन्हाळ्यात जनावरांना सावलीत ठेवणे, स्वच्छ व पुरेसे पाणी देणे, तसेच भर उन्हात वाहतूक टाळणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी रस्त्यावरील पशू-पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी आणि मृत पशुधनाची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कोणत्याही अडचणीसाठी स्थानिक पशुवैद्यकीय दवाखाना किंवा १९६२ हेल्पलाईनचा लाभ घ्यावा असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.

जळगावात पारा 43 अंश सेल्सिअसवर 

जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट आल्याचं पहायला मिळत आहे. जिल्ह्यात उन्हाचा पारा  तब्बल 43 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे.  तीन दिवसापूर्वी वातावरणात बदल झाल्याने तापमानात घट होऊन तापमान 41 अंशावर आले होते.  आता तापमानात पुन्हा वाढ झाली असून तापमानाचा पारा 43 अंशावर पोहोचला आहे. वाढत्या तापमानामुळे उकाड्यात मोठी वाढ झाली असून, जळगावकर हैराण झाले आहेत. वाढत्या तापमानापासून खबरदारी घेण्याचं आवाहान जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

नाशिक जिल्हा तापला  

नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावमध्ये प्रचंड उष्णतेची लाट आल्याचं पहायला मिळत आहे.  मालेगावचा पारा ४२.८ अंश सेल्सिअसवर पोहोचला असून,  उन्हाचा तडाखा अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाढत्या उन्हाचा परिणाम मानवी जीवनावर दिसून येत असून वाढत्या उन्हामुळे रस्ते आणि बाजारपेठांमध्ये शुकशुकाट झाला आहे. परिणामी दुपारी १२ ते ४ या वेळेत  लोक अत्यावश्यक कामाशिवाय घराच्या बाहेर पडणे टाळत आहेत. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.

परभणीचं तापमान 43 अंश सेल्सिअसवर  

परभणीमध्ये तापमानाचा पारा 43 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. जिल्ह्यात उष्णतेची लाट आल्याचं पहायला मिळत आहे. मात्र याचा नागरिकांवर म्हणावा असं परिणाम झालेला नाही, रस्त्यावरची वर्दळ अजूनही कमी झालेली नाहीये. नागरिकांनी घाबाहेर पडू नये अशा सूचना आरोग्य विभागाकडून करण्यात आल्या आहेत.

अमरावतीमध्ये 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद  

अमरावतीमध्ये तर तब्बल 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे नागरिक घराबाहेर पडताना काळजी घेत आहेत.  पुढील काही दिवस अमरावतीमध्ये अशाच पद्धतीने तापमानात वाढ होणार असल्याचा हवामान विभागाकडून अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान पुढील दोन दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट पहायला मिळण्याची शक्यता आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *