
महाराष्ट्रात आज कसं असेल हवामानImage Credit source: प्रातिनिधिक फोटो
एकीकडे अख्ख राज्य भीषण उकाड्याने , उष्णतेच्या लाटांनी त्रस्त झालेलं असतानाच आता महाराष्ट्रातील हवामानाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. मे महिन्यातील कडाक्याचं ऊन आणि उन्हाच्या झळांनी नागरिक अगदी मेटाकुटीला आलेत, हैराण झालेत. मात्र आता याच दरम्यान हवामानाबद्दल अपडेट समोर आली आहे. अर्ध्या महाराष्ट्रावर आता मोठं संकट येऊ शकतं. काही ठिकाणी अवकाळी पावसाच कहर सुरू असून आता हवामाना विभागतर्फेही अलर्ट देण्यात आला आहे. आज, 9 मे रोजी अर्ध्या महाराष्ट्रावर वादळी पावसाचं संकट घोंगावत आहे. तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर गारपिटीचा इशाराही काही भाग देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रावक दुहेरी संकट घोंगावत असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मध्य प्रदेशापासून विदर्भ, मराठवाडा, कोमोरीन भागांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे विदर्भ, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगाळ हवामानसह पावसाला पोषक हवामान आहे अशी माहिती समोर आली आहे.
कसं असेल हवामान ?
महाराष्ट्रात पुढील काही दिवस उष्णता, दमट हवामान आणि अवकाळी पावसाचे दुहेरी संकट कायम राहणार असू शकतं, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबईसह कोकण पट्ट्यात आजही उष्ण आणि दमट वातावरणाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये तापमान 32 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता असून आद्रता 80 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते. दक्षिण कोकणात पुढील 48 तास अवकाळी पावसाचा धोका कायम असल्याने नागरिकांना सतर्कतेचा सल्ला देण्यात आला आहे.
अवकाळी पावसाचे सावट गडद
मध्य महाराष्ट्रातही अवकाळी पावसाचे सावट गडद झालं आहे. आज, शनिवार 9 मे रोजी कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. घाटमाथा परिसरात पावसाचा जोर अधिक राहू शकतो. तापमान 37 ते 40 अंशांच्या दरम्यान राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्रात उन्हाचा कडाका की पाऊस पडणार ?
उत्तर महाराष्ट्रात मात्र उष्ण आणि कोरड्या हवामानाचा प्रभाव कायम राहणार आहे. नाशिकसह धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये पावसाची जराही शक्यता नाही. तेथील नागरिकांची उन्हाने काहिली होऊ शकते. उलट तेथील तापमान आजा 38 ते 42 अंश सेल्सिअस वर जाण्याची शक्यता आहे. तर किमान तापमान हे 22 ते 26 अंशांदरम्यान राहील आणि उष्णतेची तीव्रता अधिक जाणवू शकते. त्यामुळे नागरिकाना उन्हात बाहेर न पडण्याचा, भरपूर पाणी पिण्याचा आणि उन्हात काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मराठवाड्यातही उष्णतेचा कहर कायम असेल, मात्र असं असलं तरीही तिथे अवकाळी पाऊस होऊ शकतो असा अलर्ट आहे. त्यामुळे उन्हापासून बचाव करायचा की छत्री काढून पावसापासून वाचायचं असा संभ्रम नागरिकांमध्ये आहे.
विदर्भामध्येही वादळी पावसाचा धोका कायम आहे. चंद्रपूर, यवततमाळमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून नागपरू, अमरावतीसह इतर बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ताशी 40 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून तापमान 39 ते 43 अंशांच्या आसपास राहू शकते. मात्र गडचिरोली जिल्ह्याला या इशाऱ्यातून वगळण्यात आलं आहे.
एकूणच, पुढील दोन दिवस राज्यातील हवामान अस्थिर राहण्याची शक्यता असून अनेक भागांत वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राज्यातील 22 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करावे आणि मच्छिमारांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांकडे लक्ष देऊन त्याचे नीट पालन करावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.
जोरदार वादळी पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) कुठे? – यवतमाळ, चंद्रपूर
वादळी पावसाचा इशारा (यलो अलर्ट) कोणाला ? : सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा.
उष्ण व दमट हवामान (येलो अलर्ट) कुठे असेल ? : पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.