
अभिनेता रितेश देशमुखचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट 1 मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. रितेशनेच या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून यामध्ये त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य भूमिकासुद्धा साकारली आहे. एकीकडे सोशल मीडियावर आणि थिएटरमध्ये या चित्रपटासाठी क्रेझ पहायला मिळत असून, दुसरीकडे रितेशने अतिउत्साही चाहत्यांना एक विनंती केली आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत त्याने चाहत्यांना ही गोष्ट टाळण्याची विनंती केली आहे.
काय म्हणाला रितेश?
“आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आम्ही चित्रपट काढला. ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट तुम्ही स्वत:चा समजून थिएटरमध्ये तो पहायला गेलात. या चित्रपटाला मिळणाऱ्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल मी आणि चित्रपटाची संपूर्ण टीम तुमचे आभार मानतो. फक्त एक विनंती आहे, मला तुमच्या भावना समजत आहेत की तुम्ही उत्सुकतेपोटी थिएटरमध्ये व्हिडीओ काढत आहात, तुम्ही बाहेर पोस्ट करत आहात. पण व्हिडीओ पोस्ट करू नका अशी विनंती तुम्हाला करतो. फोटो पोस्ट करा, माझी काहीच हरकत नाही. कारण इतर जे प्रेक्षक थिएटरमध्ये चित्रपट बघायला येणार आहेत, त्यांना पण काही सरप्राइज मिळू द्या, त्यांनाही चित्रपटाचा आनंद घेऊ द्या. तुमचा प्रतिसाद असाच असू द्या, जय शिवराय,” अशी विनंती त्याने चाहत्यांना केली आहे.
अनेकजण थिएटरमध्ये चित्रपटातील काही सीन्सचे व्हिडीओ शूट करून ते सोशल मीडियावर पोस्ट करतात. यामुळे त्यातील सरप्राइज इतरांना कळून जातात आणि चित्रपटाविषयी फारशी उत्सुकता राहत नाही. ‘राजा शिवाजी’मधील सलमानच्या एण्ट्रीचा सीन सोशल मीडियावर अशाच पद्धतीने व्हायरल झाला होता. त्यानंतर तो काढून टाकण्यात आला होता. परंत तोवर त्याचे स्क्रीनशॉट्स सर्वत्र व्हायरल झाले होते. अशा घटना टाळण्यासाठी रितेशने चाहत्यांना ही विनंती केली आहे.
‘राजा शिवाजी’ने शनिवारी 10.55 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर पहिल्याच दिवशी 11.35 कोटी रुपयांची कमाई झाली होती. त्यामुळे दोन्ही दिवसांच्या कमाईचा आकडा हा 21.90 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. राजा शिवाजी या चित्रपटासोबतच बॉक्स ऑफिसवर आमिर खानचा मुलगा जुनैद याचा ‘एक दिन’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. मात्र रितेशच्या चित्रपटावर या बॉक्स ऑफिस टक्करचा फारसा परिणाम झाला नाही.